Friday, November 12, 2010

‘जगदंबा आली दारी, नका पाठवू माघारी’

नवरात्र महोत्सवाचे औचित्य साधून मोहटा देवस्थानने राबविलेल्या स्त्री भ्रूणहत्या विरोधातील ‘जगदंबा आली दारी, नका पाठवू माघारी’ या उपक्रमाचे भाविकांमधून स्वागत होत आहे.
मुलगाच हवा हा अट्टाहास, समाजात मुलींना मिळणारी दुय्यम दर्जाची वागणूक, दिवसेंदिवस हुंडाबळी प्रकरणात होणारी वाढ यामुळे मुलींचा जन्मदर घटत चालला आहे. राज्यात १९९१ साली १ हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण ९४६ होते. ते २००१मध्ये ९१३वर आले. नगर जिल्ह्य़ात हेच प्रमाण सन २००१मध्ये ८८४ होते. ते आज घटत जाऊन ८५२वर आले आहे. सरकार, विविध सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते या समस्येवर आवाज उठवित असले, तरी याचे गांभीर्य समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले नाही. या समस्येची जाणीव भाविकांना, विशेषत: महिलांना व्हावी या हेतूने देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश नागेश न्हावकर यांनी पुढाकार घेऊन ‘जगदंबा आली दारी, नका पाठवू माघारी’ ही संकल्पना मांडली. त्याला देवस्थान विश्वस्त शिवाजी फुंदे, श्रीधर गिरी, अर्जुन दहिफळे व इतर विश्वस्तांनी संमती दिली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा सामान्य रुग्णालय व देवस्थान समितीच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प सध्या गडावर राबविला जात आहेत. या उपक्रमाचा एक भाग म्हणून नवरात्राच्या पहिल्या माळेपासून पोलीस, न्यायाधीश, डॉक्टर, वकील, राजकारण, समाजकारण, परिचारिका, शिक्षण या क्षेत्रातील पाच नामवंत महिलांचा सत्कार करण्यात येत आहे. याशिवाय देवस्थान समितीने गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी लाखो माहिती पुस्तिका छापल्या असून, त्याचे भाविकांना दररोज वाटप केले जाते. या पुस्तिकेत स्त्री भ्रूणहत्येचे कसे दुष्परिणाम समाजाला भोगावे लागतात, होणारी शिक्षा याची माहिती देण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत देवस्थान समितीने दर्शनबारी रांगेत या विषयावरील मोठे कटआऊटस् लावले असून, त्यावर ‘तोरण बांधा रे, उघडा दारे, पसरा पायघडय़ा, टाका फुलं, नकोत नुसतीच मुलं’, ‘स्त्रीचा जन्म स्त्रीच्याच गर्भात, मग येऊ द्या ना तिला या जगात’ अशा घोषवाक्यांचा चांगला परिणाम झाला आहे. याशिवाय नगर जिल्ह्य़ातील सर्व तालुक्यांची स्त्री जन्मदराबाबतची सन २००१ ते २००९पर्यंतची तुलनात्मक आकडेवारी दिली आहे. जिल्ह्य़ात २००९च्या गणनेनुसार सर्वाधिक प्रमाण अकोले (९५१) येथे आहे. तर व्हिजन-२०२०ची अंमलबजावणी करणाऱ्या पालकमंत्री पाचपुते यांच्या श्रीगोंद्यात हे प्रमाण फक्त ८२२ आहे.
देवीच्या दर्शनास लाखो भाविक येतात. त्यांना या समस्येची जाणीव झाली, तर राज्यभर जागृती होईल. या हेतूने सामाजिक ऋण फेडण्याच्या भावनेने आम्ही हे अभियान राबविले. जिल्हा पोलीसप्रमुख कृष्णप्रकाश यांच्या हस्ते उद्घाटन झाले. देवस्थान समितीचे अध्यक्ष, तसेच सर्व विश्वस्तांनी पाठिंबा दिल्याने पदाच्या माध्यमातून एक प्रकारे देवीची सेवा करत असल्याचे समाधान मिळत आहे.

No comments:

Post a Comment